चाळीसगाव- तालुक्यातील वाकडी येथील अमित साहेबराव पाटील या जवानाला काश्मिरातील हिमवृष्टीत जखमी झाल्यानंतर जवानाचा मृत्यू झाला आहे.
वाकडी येथील अमित साहेबराव पाटील (वय-३२) या सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये कार्यरत असणार्या जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले आहे. अमित पाटील हे सीमारेषेवर कर्तव्यावर असतांना तुफान हिमवृष्टीत अडकून जखमी झाले होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार असतांनाच आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
जवानाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. अमित पाटील शहिद झाल्याचे कळताच वाकडी गावावर शोककळा परसरली आहे. शहीद जवान यांचे पार्थिव आज रात्री जम्मू काश्मिर येथून घेण्यात येणार असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तसेच काही दिवसांपूर्वीच श्रीनगर भागातील एचएमटी भागात दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर भ्याड बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव येथील वीर जवान दिगंबर देशमुख यांना वीरमरण आले होते. त्यानंतर पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गेल्या २० दिवसांत चाळीसगाव तालुक्याने दुसरा जवान गमावला आहे.