जळगाव – राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेतून कोणताही मोहल्ला, गल्ली, वस्ती गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची यंत्रणेने दक्षता घ्यावी. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्यात.
सातवी आर्थिक गणनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी तथा सदस्य सचिव आर्थिक गणना प्रमोदराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह विविध पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचेसह कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना गणना करणाऱ्या प्रगणकास सहकार्य करण्याच्या सुचना द्याव्यात. तसेच गावातील संपूर्ण वस्ती गणनेमध्ये समाविष्ठ होण्यासाठी गावातील लोकसंख्या, वार्ड रचना, नव्याने निर्माण झालेल्या वस्त्यांबाबतची माहिती प्रगणकास देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गणना करणारे प्रगणक माहिती घेण्यासाठी आल्यानंतर नागरीकांनीही त्यांना सहकार्य करुन आवश्यक ती माहिती द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले. जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे काम सर्वांच्या समन्वयाने 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील गणनेचे काम पूर्ण करण्यासाठी 1688 प्रगणकांची व 519 पर्यवेक्षकांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. तसेच जिल्ह्यात 1153 ग्रामीण व 2196 शहरी गटांची संख्या असून त्यापैकी 1103 ग्रामीण तर 1533 गटांच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. तर ग्रामीण भागात 2 व शहरी भागात 16 गटांचे काम सुरु असून अद्याप ग्रामीण भागातील 48 व शहरी भागातील 647 गटांचे काम सुरु झाले नसल्याची माहिती दिली. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जळगाव, भुसावळ, पाचोरा, यावल व रावेर तालुक्याचे गटविकास अधिकारी व फैजपूर व सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आढावा बैठका घेऊन प्रगणकांना गणनेचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात.