मुंबई: कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सोमवारपासून सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई मेट्रो सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळातच धावेल. भविष्यात गरज भासल्यास या वेळेत वाढ केली जाईल, असे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांना नव्या सवयींचे पालन करावे लागेल. यापूर्वी मेट्रो एका स्थानकावर 15 ते 20 सेकंद थांबत असे. परंतु, आता ट्रेनमधील हवा सतत खेळती ठेवण्यासाठी मेट्रो एका स्थानकावर 30 ते 60 सेकंदांपर्यंत थांबेल. प्रत्येक मेट्रो स्थानकावर आत आणि बाहेर जाण्यासाठी प्रत्येकी एकच मार्ग खुला राहील. उद्यापासून दररोज मेट्रोच्या 200 फेऱ्या होतील. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता प्रत्येक फेरीत 300 जण प्रवास करु शकतात.
प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक दोन तासानंतर मेट्रोच्या स्थानकांवरील सर्व टचपॉईंटस सॅनिटाईझ केले जातील. तर मेट्रोच्या प्रत्येक फेरीनंतर ट्रेनही सॅनिटाईझ होईल. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक असेल. मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग होईल. तर ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक असेल.
आतापर्यंत मेट्रोच्या तिकीटासाठी प्लॅस्टिक टोकन दिले जात होते. परंतु, आता कोरोनामुळे ही पद्धत बंद करुन कागदी तिकीट आणि मोबाईल तिकीटचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.
मोनोरेल आजपासून पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत
कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेली 7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा एकदा रुळावर आली आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत मोनोरेल सुरु करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मोनो रेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यामुळं लोकलवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी 7 वाजता आज पहिली मोनो रेल चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावली. ही मोनोरेल चेंबूर ते जेकब सर्कलपर्यंत धावणार आहे.
अजून वाचा
राज्य घटना बदलण्यासंदर्भात खासदार संभाजीराजेंचे मोठे वक्तव्य