चाळीसगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने राज्यातील आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान देण्याचे मंत्रिमंडळाच्या १२ ऑगस्ट २०२०च्या बैठकीत जाहीर झाले आहे.
प्राधान्यक्रमाने कुटुंब संख्या व लोकसंख्या निश्चिती संबंधित आदिवासी विभागाच्या माध्यमातून करण्यात येऊन सध्या या कुटुंबांचे प्रत्यक्ष लाभासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पोस्ट, राष्ट्रीय कृत बॅकेत खाते असलेले बॅक पासबुक, जातीचा दाखला ई. कर्मचारी जमा करण्याचे काम करत असून दोन-तीन दिवसातच सदर कागदपत्रे जमा झाले पाहिजेत तरच लाभ मिळेल असे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता सर्वेक्षण झालेल्या कुटुबापैकी पन्नास टक्के कुटुंब सध्या उस तोडणी साठी स्थलांतरीत झाले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शाळा बंद असल्याने जवळपास बरेच संपुर्ण कुटुंबच स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे गावात बहुतेक घरांना कुलुपच कर्मचारी वर्गाला दिसत आहेत. त्यामुळे गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सन १९७८ पासून राज्य शासनाकडून खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांचे मार्फत राबविण्यात येते.सन २०१४ पासून सदर योजना बंद झाली होती. ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुनर्जिवीत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या १२ ऑगस्ट २०२० च्या बैठकीत घेण्यात आला आहे. गरीब आदिवासी कुटुंबाना पावसाळ्यात हाताला काहीही कामे नसल्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात खावटी कर्ज पन्नास टक्के रोख रक्कम व पन्नास टक्के किराणा माल वस्तू स्वरूपात दिला जात असतो.थकीत झाल्याने काही वर्षे ही योजना बंद पडली होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा खावटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
आदिवासी विकास विभाग,महामंडळ या यंत्रणेच्या उदासिन धोरणामुळे व आपसात समन्वय नसल्यामुळे सदर खावटी अनुदान योजना वाटपाचे काम अतिशय कासव गतीने चालले आहे.खावटी अनुदान मिळणार म्हणून अनेक कुटुबे आनंदात होती.परंतु यापैकी जवळपास पन्नास टक्के कुटुंब सध्या उस तोडणी साठी बाहेर गावी स्थलांतरीत झालेली आहेत. त्यामुळे या कुटुंबाना लाभ कसा मिळणार असा पश्न निर्माण झाला आहे.संबंधित विभागाने या स्थलांतरीत आदिवासी कुटुंबानाही प्राधान्याने खावटी अनुदानाचा लाभ त्वरीत मिळावा.अशी मागणी पारधी समाज सुधार समिती संस्थापक सोमनाथ माळी व पदाधिकारीनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.