जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक १, २ व ३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे. Covid-19 या महामारी या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन होत असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून हा महोत्सव साजरा होणार आहे. नाट्य मंदिराच्या एकूण आसन क्षमतेच्या ५०% रसिकांनाच या महोत्सवास उपस्थित राहता येणार आहे. सोशल डिस्टंसिंग, शरीराचे तापमान, सॅनिटायझेशन, मास्क लावूनच रसिकांना प्रवेश मिळणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र संस्कृती केंद्र उदयपूर यांच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या १९ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि. भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, श्री महावीर सहकारी बँक लि. हे असून भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात यावर्षीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
महोत्सवाची सुरुवात दि. १ जानेवारी रोजी प्रथम सत्रात सुर नवा ध्यास नवा फेम तरुण, उदयोन्मुख आणि आश्वासक अशी कलावंत शरयू दाते हिच्या गायनाने होणार आहे. द्वितीय सत्र वेणू वादनाने अर्थात बासरी वादनाने संपन्न होणार आहे द्वितीय सत्राचे कलाकार आहेत मुंबई येथील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत अश्विन श्रीनिवासन. त्यांना तबल्याची साथ ओजस अढिया तर गिटार ची साथ कलकत्याचे संजोय दास करणार आहेत
द्वितीय दिनाची सुरुवात कलकत्ता येथील संगीत रिसर्च अकादमीचे गुरु ओमकार दादरकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना तबला संगत पुण्याचे चारुदत्त फडके तर संवादिनी संगत पुण्याचेच मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र प्रख्यात नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनिस व सहकारी हे कथक नृत्याच्या माध्यमातून बॉलीवूड फूट प्रिंट्स हा नृत्याविष्कार सादर करणार आहे.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र ओरिसा येथील गोटीपुवा या लोकनृत्याचे सादरीकरण समूह नृत्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. या नृत्य प्रकारा वरूनच ओडिसी डान्स ची निर्मिती झाली आहे. या सादरीकरणालाच लागून भुवनेश्वर येथील प्रख्यात नृत्यांगना सुश्री मोहंती यांचे ओडिसी नृत्य सादर होणार आहे. १९ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप एका वेगळ्या आणि अनोख्या आविष्काराने करणार आहोत. मराठी चित्रपट संगीताची पहिली पाच दशके म्हणजे १९१० ते १९६० या काळात मास्टर कृष्णराव फुलंबीकर, पु. ल. देशपांडे, श्रीनिवास काळे, सुधीर फडके, आणि वसंत प्रभू यांच्यासारखे दिग्गज संगीतकार लाभले, म्हणूनच तो काळ मराठी चित्रपट संगीतातील सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो.
या सुवर्ण काळाचा वेध घेणारा संगीत नाट्यानुभव म्हणजे जे आम्ही दुनियेचे राजे संगीत आणि नाट्य यांचा मिलाफ घडवून वरील दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी सिनेमातील गाणी सुश्राव्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे गाण्याची रचना ही आजच्या पिढीला साद घालणारी तरीदेखील सुवर्णकाळ जपणारी आहे. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शक देवेंद्र भोमे यांनी ही सर्व गाणी पुन्हा नव्याने संगीत बद्ध केली असून ते सध्या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचे लेखन दिग्दर्शन व संगीत संयोजन देवेंद्र भोमे यांनी केले असून या कार्यक्रमात सहभागी कलावंत जयदीप वैद्य, आशुतोष मुंगळे, श्रुती आठवले, मुक्ता जोशी, केतन पवार, व देवेंद्र भोमे असून गौतमी देशपांडे व अभिजित खांडकेकर याचे सूत्रसंचालन आहे. तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा नाविन्याचा अविष्कार असून या कार्यक्रमाने एकोणविसाव्या बालगंधर्व महोत्सवाची सांगता होणार आहे.
महोत्सवाच्या तीनही दिवसांचे सुत्रसंचालन मुंबई च्या दिप्ती भागवत करणार आहेत. तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर तसेच विविध प्रायोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी विश्वस्त अशोकभाऊ जैन दत्ता सोमण प्राध्यापक शरदचंद्र छापेकर सौ दीपिका चांदोरकर दीपक चांदोरकर अरविंद देशपांडे डॉक्टर अपर्णा भट व रमेशदादा जैन यांनी केले आहे.