जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले असून काही भागात पाऊस देखील पडला आहे. तसेच शहरात अनेक भागात डेंग्यू, मलेरिया आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जळगाव महापालिकेची आरोग्य यंत्रणा सुस्तावल्यामुळेच शहरात ‘डेंग्यू’ वाढत आहे. त्यासाठी शहरातील उघड्या गटारी, नाले, साठलेला कचरा त्वरित उचलून शहरातील प्रत्येक कॉलनीत धूर फवारणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी केली आहे.
शहरातील मेहरूण, तांबापुरा, शाहू नजर, वानखेडे हौ.सोसायटी, शनीपेठ, गेंदालाल मिल, शिवाजी नगर, ओंकार नगर, नवीपेठ, समता नगर, हरी विठ्ठल नगर परिसर, पिंप्राळा परिसर, सुप्रीम कॉलनी परिसर, जुने जळगाव, संभाजी नगर, आसोदा रोड, प्रजापत नगर परिसर आदीसह इतर महत्वाच्या ठिकाणी अस्वच्छतेचे मोठे साम्राज्य आहे. कचरा उघड्यावर पडून डेंग्यू, मलेरिया डासांचे प्रमाण मोठे वाढत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनेक भागांत धूर फवारणी बंदच आहे. तर सत्ताधारी नगरसेवकांनी देखील नागरिकांच्या प्रश्नांकडे पाहणे सोडून दिल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे आरोग्य सभापती कुठलाही आढावा घेत नाही. त्यांनी शहरात धूर फवारणी करणे, शहरात पूर्ण १९ प्रभागात साफसफाईचे नियोजन करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य सभापतींच्या सततच्या गंभीर दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णदेखील वाढू शकतात. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देत डेंग्यू, मलेरिया नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी केली आहे.