जळगाव प्रतिनिधी । अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण परिसरात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवार 11 डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० कारवाई केली. वाळूने भरलेले ट्रक्टर जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी येथील गिरणा नदीच्या पत्रातून बेकायदेशीर ट्रॅक्टरने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. शिकारे यांनी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.कॉ. योगेश बारी, पोहेकॉ जितेंद्र राजपूर होमगार्ड किरण जोशी, शिवदास कळसकर अशांना ट्रक्टरवर कारवाईसाठी रवाना केले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरातील मेहरूण परिसरातील बागेजवळ वाळूने भरलेले ट्रक्टर आढळून आले.
ट्रॅक्टर चालकाला वाळू वाहतूक करण्याची परवाना मागितले असता उडवाउडवीची उत्तरे चालक संदीप मधुकर कोळी (वय-२०) रा. नागझिरी ता.जि.जळगाव याने दिली. वाळू वाहतूकीचा पंचनामा करून ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. असून पोहेकॉ जितेंद्र राजपूत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.