मुंबई : राज्य सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे आणि त्यामुळेच आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहे. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे याचं एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारनं काढलंय. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे. कपड्यांवरुन सरकारी कर्मचारी ओळखला जावा आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जबाबदार व्यक्ती समजलं जावं, यासाठी हा बदल केला गेलाय. आता सरकारनं कर्मचाऱ्यांचे कपडे बदलले असले, तरी त्यांची काम करण्याची पद्धत मात्र तीच राहणार आहे. ज्या पद्धतीचा त्रास नागरिकांना सर्वाधिक होतो, ती पद्धत बदलण्यासाठी सरकारनं काही तरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे, तरंच कपड्यांसोबत बदललेला सरकारी कर्मचारीही व्यवस्था बदलाचा भाग बनेल.