जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था मुख्य गेट क्रमांक २ पासून करण्यात आली आहे. यामुळे महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे डॉक्टर,अधिकारी, कर्मचारी तसेच इतर नागरिकांची वाहने शिस्तीत लागणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोना हॉस्पिटल म्हणून सुरू आहे. तिथे कोरोनाबाधित आणि कोरोना संशयित रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. आज सुमारे १०० रुग्ण येथे उपचार घेत आहेत. रुग्णालयात व महाविद्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक तसेच डॉक्टर, कर्मचारी आवारामध्ये आपली वाहने कुठेही व कशीही पार्किंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पार्किंग समितीचे गठण केले.
त्यानुसार गेट क्रमांक २ कडील असलेल्या जुन्या वसाहतींच्या रिकाम्या जागेचा पार्किंगसाठी वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली वाहन पार्किंग गुरुवारी १० डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेर्यांची यंत्रणादेखील उभारण्यात येत आहे. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक वाहनाला स्टिकर लावण्यात येणार असून मुख्य गेट क्र.१ मधून फक्त रुग्णवाहिका, पोलीस वाहन व आपत्कालीन वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली.