भुसावळ- तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे कापूस खरेदीत खोळंबा होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी रास्ता रोका आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.
सध्या शासकीय कापूस खरेदी सुरू आहे. या अनुषंगाने तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील दोन जीनींगमध्ये शासकीय खरेदी केली जात आहे. यात अनेक गैरप्रकार होत असल्याची ओरड सुरू आहे. यात प्रामुख्याने व्यापार्यांना टोकन विकले जात असल्याची तक्रार असून खर्या कापूस उत्पादकांना वाट पहावी लागत आहे.
मात्र काल दुपारपर्यंत सुशीला जीनींगमध्ये केंद्रप्रमुख न आल्याने कापूस खरेदी झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बाजार समितीच्या कर्मचार्यांनी संबंधित वाहनांना टोकन देऊन कापूस मोजला जाईल, असे आश्वासन दिले व आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
मात्र चार वाजेपर्यंत कोणत्याही अधिकार्याने कापूस खरेदी केली नाही. त्यामुळे पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर तालुका पोलीस स्थानकाच्या सपोनि रुपाली चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी कापूस खरेदी सुरू केल्याने अखेर हा वाद मिटला.