जळगाव – संत्रा बागायतदार शेतकरी बांधवांना सुचीत करण्यात येत आहे की, सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यात संत्रा बगीच्यांमध्ये झाडाना हस्त बहाराची नविन नवती फुटलेली आहे. या नविन नवती व मध्यम परिपक्व पानांवर रस शोषण करणा-या काळीमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
काळया माश्यांचे प्रौढ व पिल्ले कोवळया पानातील अन्न रसाचे शोषण करतात व शरीरातून मधासारखा चिकट गोड पदार्थ उत्सर्जित करतात व त्यावर काळया बुरशीची पानांवरती झपाटयाने वाढ होते. या बुरशीमुळे संपूर्ण बाग काळीशार दिसते, यालाच कोळशी असे म्हणतात. कोळशीमुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. किडीव्दारे रस शोषलेली झाडे दुर्बल होतात व पुढील बहरात फळधारणा कमी होते.
सध्याच्या स्थितीमध्ये काळया माश्यांचे प्रौढ व अंडी पानांच्या खालच्या बाजूस आढळून आलेली आहेत. या किडींच्या नियंत्रणासाठी ईमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल @ ०.५ मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्लूजी @ ०.३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. प्रौढ उत्पत्ती व पन्नास टक्के अंडी उबण्याची स्थिती हि फवारणी करीता योग्य वेळ असते. कारण या अवधित किडींच्या प्रथमावस्था झाडांवर उपलब्ध असतात.
पन्नास टक्के अंडी उबण्याचा कालावधी हस्त बहार मध्ये डिसेंबरचा पहिला पंधरवडा किडींच्या नियंत्रणासाठी योग्य ठरविण्यात आला आहे. तसेच कोळशी (काळी बुरशी) या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सी क्लोराईड (COC) ०.३%@३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, असे आवाहन डॉ. कैलास मोते, संचालक, फलोत्पादन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.