जळगाव । बीएचआर घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत येत असून, याबाबत रोज नवनवीन बाबी समोर येत आहे. या घोटाळात मुख्य संशयित असलेला व्यावसायिक सुनील झंवर यांचे जळगाव महापालिकेतील एका माजी महापौरांशीही घनिष्ट संबंध असल्याचे उघड झाले आहे. या माजी महापौराकडे जर चौकशी केली गेली तर तपास यंत्रणेला झंवरच्या संदर्भातील उपयुक्त माहिती मिळू शकते.
बीएचआरमध्ये अनेक ठेवीदारांचा पैसा अडकला असून, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या कार्यकाळापासून या पतसंस्थेत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे. या घोटाळ्यात व्यावसायिक सुनील झंवर यांचेही नाव समोर आले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ११०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास आहे. त्यांनी आतापर्यंत सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांखला (४०, रा. शिव कॉलनी), महावीर मानकचंद जैन (३७ , रा.गुड्डूराजा नगर), ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (४५, रा. देवेंद्र नगर) सुजीत सुभाष बाविस्कर (वय ४२, रा.पिंप्राळा) व कंडारेचा वाहनचालक कमलाकर भिकाजी कोळी (२८, रा. के. सी. पार्कमागे, जळगाव) या पाच जणांना ताब्यात घेतले असून, ते सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत आहेत.
मात्र प्रमुख संशयितांपैकी अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवर हे अद्यापही फरार आहेत.
२७ नोव्हेंबर पासून ते आज अखेर (८ डिसेंबर) दोघेही फरार आरोपी हे तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकू शकलेले नाहीत. फरार आरोपींपैकी सुनील झंवर याचे जळगाव महापालिकेच्या एका माजी महापौरांशी घनिष्ट संबंध आहेत. तपास यंत्रणांना झंवरची इत्यंभूत माहिती हवी असल्यास त्यांनी या माजी महापौराकडे चौकशी केली तर त्यांना उपयुक्त संदर्भ मिळू शकतात, अशीही चर्चा आहे.
बीएचआर प्रकरणाचा तपास पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. त्यांच्या ताब्यात असलेले पाच संशयित हे पुण्यात आहेत, तर दोन मुख्य संशयित फरार आहेत. संशयित सर्वांची घरे, त्यांचा जवळचा मित्र परिवार जळगावमध्ये आहेत. पोलिसांना फरार आरोपी जर आपल्या ताब्यात हवे असतील, तर त्यांनी या संशयितांच्या घनिष्ट संपर्कात असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी करणे आवश्यक असल्याचा सूरही ऐकायला मिळत आहे.
बीएचआर प्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत त्यांना जामीन मिळूून ते बाहेर येऊ शकतात. पण दुसरीकडे मुख्य संशयित अजूनही फरार आहेत. अशा स्थितीत संशयितांना जामीन मिळू नये म्हणून ठेवीदार त्रयस्थ अर्जदार होऊ शकतात. त्यासाठी ठेवीदारांना एका पानाचे प्रतिज्ञापत्र वकिलांमार्फत न्यायालयात सादर करावे लागेल. एमपीडीएचे कलम लागलेल्या गंभीर प्रकरणात फरार दोन म्होरके जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत इतर संशयितांनी बाहेर येणे हे ठेवीदारांसाठी कितपत हितावह ठरू शकते याचा निर्णय स्वतः ठेवीदारांनाच घ्यावा लागणार आहे, असे देखील तज्ञ सांगत आहेत.