नवी दिल्ली | करोना लस कधी येणार याची देशभरातील सर्व नागरिक प्रतीक्षा करतं आहेत. यातच कोविड-19 लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मंगळवारी चौथ्या ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चे (आयएमसी2020) उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पार पडलं. त्यावेळी ते बोलतं होते.
भारतास दूरसंचार उत्पादने, त्यांचे डिझाइन, विकास आणि निर्मिती याचे मोठे केंद्र बनविण्याची सरकारची योजना आहे. येत्या तीन वर्षांत प्रत्येक गाव व खेडे हायस्पीड फायबरने जोडले जाईल. त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.
भारतातील मोबाइल दर सर्वाधिक कमी आहेत. तसेच आपला ॲप बाजार सर्वाधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे 5जी मोबाइल सेवा लवकर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ‘मल्टी-जीबीपीएस पीक डेटा स्पीड’ उपलब्ध होऊ शकेल, असंही मोदी म्हणाले आहेत.