जळगाव प्रतिनिधी । एन.जे. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा दूध संघात मोठा घोटाळा झाल्याचे आरोप केले. जिल्हा दूध संघातून एन.जे. पाटील यांना १९९९ साली बडतर्फ करण्यात आले असून नंतर न्यायालयाचे निकालही त्यांच्या विरूध्द लागले आहेत. यामुळे त्यांनी आज केलेले आरोप हे आकस बुध्दीने करण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरूध्द बदनामीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा दूध संघाने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
तसेच व्यवस्थापनाने नियमबाह्य पध्दतीत कागदपत्रे जाळून टाकल्याचा आरोप देखील केला. यावर जिल्हा दूध संघाने लेखी निवेदन सादर केले आहे. ते आपल्यासाठी जसेच्या तसे सादर करत आहोत. एन.जे. पाटील यांना संघाने दिनांक १८/१२/१९९९ रोजी संघाच्या सेवेतून बडतर्फ केलेले आहेत. त्याबाबत त्यांनी कामावर घेण्याबाबत विविध न्यायालयात दावे दाखल केले होते.
तथापी त्या संदर्भातील सर्व निकाल एन.जे. पाटील यांच्या विरोधात लागलेले असून संघाने त्यांच्या विरुध्द केलेल्या कारवाईस उचीत व योग्य ठरविण्यात आलेले आहे. केवळ सूडबुध्दीने एन.जे. पाटील संघ व्यवस्थापना विरुध्द खोटे आरोप करीत असतात. श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले मुद्दे, म्हणणे चुकीचे, खोटे, दिशाभूल करणारे, तथ्यहीन आहेत. सबब ते नाकारण्यात येत आहेत. माहे ऑगष्ट २०१५ पासून सौ. मंदाकिनी एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली संघाची भरीव प्रगती झालेली आहे.
संघात १९९५ ते २०१५ या कालावधीत एन.डी.डी.बी. चे व्यवस्थापन कार्यरत होते. तदनंतरच्या काळात अर्थात ऑगष्ट २०१५ नंतर एन.डी.डी.बी. च्या कार्यकाळापेक्षा जास्त दूध संकलन दूध संघात झालेले आहे. तसेच निर्वाचित संचालक मंडळाने दुधाचे दर सन २०१५ वर्षाच्या तुलनेत दूध उत्पादकांना जास्त अदा केलेले आहेत. संघाची प्रक्रिया क्षमता ३ लाख लीटर्स प्रती दिन वरुन ५ लाख लीटर्स प्रती पर्यंत केलेली आहे. तसेच पॅकींग क्षमता सुध्दा १.५० लाख लीटर्स वरुन ३.०० लाख लीटर्स प्रती दिन पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. दुग्धजन्य पदार्थ अर्थात श्रीखंड, दही, पनिर इ . साठी नविन इमारत उभारण्यात आलेली आहे.
वरील प्रकल्प एन.डी.डी.बी. ने टर्न की, बेसीसवर पूर्ण केलेले आहेत. या सर्व प्रकल्पासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (आर.के.व्ही.वाय.) मार्च २०१९ पर्यंत सुमारे रु. २०/- कोटी अनूदान व संघाने रु. २३.०० कोटी कर्ज एन.डी.डी.बी. कडून दिर्घकालीन मुदतीचे कर्ज घेतलेले आहे. संघाकडे मार्च २०१९ मधे एन.डी.डी.बी. कडून लोणी व दूध भुकटीसाठी लागणारे रु. ३७.०० कोटी खेळते भांडवल घेतलेले आहे त्यापोटी संघाकडे त्यापेक्षा जास्त किंमतीचे लोणी व दूध भुकटी साठा उपलब्ध होता. संघ सन २०१५ पासून दरवर्षी सतत नफा कमवित आहे.
एन.जे. पाटील यांनी रक्कम रु. ११७/- कोटी बद्दल केलेले विधानामधे काहीही तथ्य नाही. संघाने लेखापरिक्षणासाठी लागणारे दस्तऐवज/रेकॉर्ड जाळलेले नाही. रेकॉर्ड नष्ट करणेबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच कारवाई करण्यात येते. एन.जे.पाटील यांना संघाच्या सेवेतून बडतर्फ केल्यानंतर संघाची प्रगती होत असतांनाही वेळोवेळी संघाबद्दल चुकीची, दिशाभूल करणारी विधाने करीत असतात. तसेच संघ व्यवस्थापनाबद्दल बदनामीकारक टिपणी करीत असतात. एन.जे. पाटील यांनी संघाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुध्द मानहानी नुकसानीचा रु. १/- कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा फौजदारी दावा करण्यात येईल.