नवी दिल्ली- महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, आता त्यात आणखीणच वाढ होताना दिसत आहे. कारण भाज्या आणि डाळीनंतर साखर, दूध आणि चहा पावडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
३० नोव्हेंबर रोजी ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ बाजारात साखरेची सरासरी किंमत ३९.६८ रुपये प्रति किलो होती, ती ७ डिसेंबरला ४३.३८ रुपयांवर गेली आहे.
याचबरोबर, खुल्या चहाच्या दरातही ११.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चहाच्या पावडरचे दर २३८.४२ रुपयांवरून २६६ रुपयांवर गेले आहेत. याशिवाय, दुधाच्या किंमतीतही जवळपास ७ टक्के वाढ होत आहे. दुधाची किंमत ४६.७४ रुपयांवरून ५० रुपये प्रति लीटर झाली आहे.
मागील काही दिवसात खाद्य तेलांच्या दरात घट झाली आहे. पाम तेलाची किंमत १०२ रुपयांवरून ९२ रुपयांवर आली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत १२३ रुपयांवरुन १२३ रुपयांवर आली आहे. शेंगदाण्याचे तेल 156 रूपयांवरून १४५ रुपये आणि मोहरीचे तेलही प्रति लिटर १३५ रुपयांवरून १३२ रुपयांवर आले आहे.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गव्हाच्या किंमतीत सुमारे १९.४५ टक्क्यांनी घट झाली आहे. यावेळी गव्हाची किंमत २९ रुपयांवरुन २४ रुपयांवर गेली आहे. याशिवाय, किरकोळ बाजारात पीठाची किंमत ३२ रुपयांवरुन २८ रुपयांवर गेली आहे. तसेच,तांदळाचे दरही घसरले आहेत. तर हरभरा आणि उडीद डाळ स्वस्त झाली.