जळगाव – शहरात अवघ्या ५००० रुपयांच्या कर्ज फेडण्यास उशीर झाला म्हणून थकबाकीदार महिलेच्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावर ‘चोर’ म्हणून फोटो पोस्ट करत बदनामी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे व्हॉट्सअॅप ग्रुप प्रोफाईलला थकबाकीदार महिलेचा फोटो लावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, त्या महिलेल्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या सर्व नंबर या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात असून यातील बहुतांश महिला आहेत.
शहरातील कालींका माता परिसरातील गृहिणीने एका स्मॉल फायनान्स कंपनीकडून ५ हजाराचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याचे कारण देत फायनान्स कंपनीने थकबाकीदार महिलेच्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. ग्रुप प्रोफाईलला महिलेचा फोटो लावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, त्या महिलेल्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या सर्व नंबर या ग्रुपमध्ये अॅड करण्यात आली. यात बहुतांश महिला आहेत.
ग्रुपमध्ये विना परवानगी अॅड केलेल्या यातील एका महिलेच्या पतीने ग्रुप अॅडमीनला फोन करून याबाबत जाब विचारला असता, त्याने सांगितले की, संबंधित महिलेने तुमचा नंबर ओळख म्हणून दिला असेल?. त्यावर आम्ही त्या महिलेला ओळखत नाही सांगितले असता फायनान्स कंपनीचा माणूस म्हणाला मग तुमचा नंबर संबंधित महिलेच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल. सबंधित फायनान्स कंपनीचा माणूस थकबाकीदार महिलेला वारंवार चोर म्हणून संबोधित करत होता. हे सगळं बेकायदेशीर आहे, असे सांगीतले असता आमची कंपनीची हीच पद्धत असल्याचे त्याने सांगितले.
फायनान्स कंपनीच्या माणसाने ग्रुप बनविल्यानंतर थकबाकीदार महिलेचे कर्जाचा तपशील, आधार कार्ड, फोटो आदी माहिती टाकली. या माहिती नुसार या महिलेचे मूळ कर्जाची रक्कम ३,७०२ रुपये आहे. परंतू देयक रक्कम ५,०८४ रुपये आहे. तर कर्ज थकीत होऊन अवघे ६ दिवस झाले आहेत. तसेच समाजात अशा पद्धतीने बदनामी झाल्याने नैराशातून कुणी आत्महत्या केली तर जबाबदार कोण?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.