नवी दिल्ली – कोरोना महामारीने देशातील कोणतेही क्षेत्र पीछेहाटीपासून वेगळे ठेवले नाहीय. अगदी सणासुदीच्या काळात तेजीत चालणाऱया देशातील सुवर्ण उद्योगालाही कोरोनाने यंदा फिके पाडले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील सोन्याची आयात 41 टक्क्यांनी घटून 33.1 टनावर आल्याचे ब्लूमबर्गच्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत देशातील नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या आयातीत 14.1 टक्के वाढ झाली आहे. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत देशाची एकूण सुवर्ण आयात 63 टक्क्यांनी घटून 220.2 टन इतकी होईल असा अंदाज आहे.
कोरोना व्हायरस महामारी, उंची किंमत आणि दुर्बल आर्थिक स्थितीमुळे ग्राहकांची सोने खरेदी करण्याची क्षमता मोठय़ा प्रमाणात घटली आहे. हिंदुस्थान हा जगातील सोने आयात करणारा दुसरा मोठा देश असला तरी यंदाचे वर्ष मात्र हिंदुस्थानी सुवर्ण उद्योगासाठी अतिशय निराशाजनक ठरण्याचेच दाट संकेत आहेत.
दिवाळीतही सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ
प्रतिवर्षी दिवाळसणात हिंदुस्थानात सोने आणि सोन्याचे अलंकार खरेदी करणाऱया ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होत असते. पण यंदा ऐन दिवाळीत कोरोनाचे संकट उभे ठाकलेले असल्याने ग्राहकांनी सोने आणि सोन्याच्या अलंकाराच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत ग्राहकांकडून होणाऱया सोन्याच्या मागणीत 70 टक्के घट झाल्याची माहिती ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलने दिली आहे.