पुणे –पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. यात 23 हजार 120 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असून, या शाखेतील 10,089 विद्यार्थ्यांचा यादीत समावेश आहे.
पुणे विभागात 304 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून, यात एकूण 1 लाख 7 हजार 30 जागा आहेत. यासाठी 1 लाखापुढे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 30 हजार 544 प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसरी फेरी अडीच महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात येणार होती. मात्र, मराठा आरक्षण स्थगितीमुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. शासनाने पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याने त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागत आहे.
दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 60 हजार 500 जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यासाठी 46 हजार 794 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेले आहेत. पहिल्या पसंतीक्रमानुसार 8 हजार 929, दुसऱ्या पसंतीक्रमानुसार 4 हजार 147, तिसऱ्या पसंतीक्रमाने 2 हजार 865, चौथ्या क्रमांकाने 2 हजार 64,पाचव्या क्रमांकाने 1 हजार 612 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आलेला आहे. या गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग-इनमध्ये प्रवेशाची माहिती उपलब्ध असून, त्यांनी प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदतआहे.