जळगाव – केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याच्या माध्यमातून शेतकर्यांना देशोधडीस लावण्याचे काम केले असून या कायद्याला विरोध करणार्या शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीने पाठींबा दिला आहे. सरकारने हा कायदा रद्द केला नाही तर खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हे देखील सहभागी झाले होते. आंदोलन संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, केंद्राने संमत केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकर्यांना उध्दवस्त करणारे ठरणार आहेत. यामुळे शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे राष्ट्रवादीचा या कायद्यांना विरोध तर आंदोलन करणार्या शेतकर्यांना समर्थन आहे. तसेच केंद्र सरकारने हे कायदे रद्द करावेत अथवा केंद्रीय मंत्री व खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा देखील आमदार अनिल पाटील यांनी याप्रसंगी दिला.