नवी दिल्ली – कृषी कायद्याविरोधात येत्या मंगळवारी (दि.8) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाला मोठे स्वरूप देण्यासाठी दिल्लीतील रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शेतकरी नेते हरविंदर सिंग लखवाल यांनी दिली. शेतकरी संघटना नेत्यांच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू असणारे आपले आंदोलन नवव्या दिवशी सुरूच ठेवले. हे कायदे रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी केला आहे.
बाजार समित्या आणि खासगी बाजारपेठे संदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करण्याचे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. बाजार समित्यांचे संरक्षण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. बाजारपेठ मुक्त वातावरण, व्यापाऱ्यांची नोंदणी यामुळे यामुळे बाजार समितीत आणि बाहेरही समान परिस्थिती राहील, असे ते म्हणाले.
पुरस्कार वापसी सुरूच
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुरस्कार परत देण्याचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी लेखक डॉ. मोहनजीत, चिंतक डॉ. जसविंदर आणि पत्रकार स्वराजबीर यांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले आहेत. गुरुवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी आपला पद्मविभूषण अवॉर्ड परत केला होता. त्यांच्यासोबतच, राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग ढींढसा यांनीदेखील आपला पद्मभूषण परत करण्याची घोषणा केली आहे.