जळगाव – शहरातील टॉवर चौकात आज रात्री ९ वाजेच्या सुमारास मद्यधुंद कंटेनरच्या चालकाने अनियंत्रितपणे वाहन चालवल्यामुळे बराच काळ गोंधळ उडाला. यात सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी परिसरात खळबळ उडाली आहे.
आज शहरात रात्री ९ वाजेच्या सुमारास एचआर ५५ एक्स-९७६६ या क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने टॉवर चौकात आला. तेथून शहर पोलीस स्थानकाकडे जाण्यासाठी त्याने टर्न घेतला तरी त्याला टर्न घेता आला नाही. यामुळे त्याने चौकातील सिग्नल तसेच सिग्नलच्या फाऊंटेशनला टक्कर देऊन नुकसान केले.
त्या मद्यधुंद कंटेनर चालकांचा व नागरिकांचा मोठा आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, शहर पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले असता तो दारू प्यालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी परिसरात काही काळ खळबळ उडाली. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.