भुसावळ : आज सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास भुसावळमधील खडका चौफुलीवर झालेल्या रस्ता अपघातात बुलढाणा येथील दाम्पत्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट मारल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात चंद्रकांत जगन्नाथ वराडे (६३) व संध्या चंद्रकांत वराडे (५६) यांचा मृत्यू झाला.
बुलढाण्यातील वराडे दाम्पत्य भुसावळातील गडकरी नगरात नातेवाईकांकडील लग्न समारंभासाठी आले होते. गुरुवारी भुसावळातील देना नगरातील नातेवाईकांकडे मुक्काम केल्यानंतर दाम्पत्य दुचाकी (एम.एच.२८ ए.एल.६६७१) ने खडका रोडने गडकरी नगराकडे येण्यासाठी निघाले असता खडका चौफुलीवर एका डंपरने कट मारून दुचाकी घसरली व दाम्पत्यही रस्त्यावर फेकले गेल्यानंतर दाम्पत्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्यांनी घटनास्थही धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.