कर्नाटक – अवैध सुरू असलेला कत्तलखाना आणि गोहत्येबाबतची माहिती दिल्याच्या रागातून जमावाने महिला पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील हासन जिल्ह्यात घडली आहे. हासन जिल्ह्यातील पेशन भागात हसन बाबू आणि रहेमान अवैध कत्तलखाना चालवत होते. हे दोघे प्राणी तस्कर असून सराईत गुन्हेगार आहेत.
या अवैध कत्तलखान्यात सुमारे 100 जनावरे होती. या कत्तलखान्यात गोहत्याही करण्यात येत होती. याबाबतची माहिती महिला पत्रकाराला मिळाली. तिने पोलीस आणि पशुप्रेमींना याबाबतची माहिती देत कत्तलखान्यात शिरून जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जनावरांना वाचवण्यासाठी तिने पशुप्रेमींच्या मदतीने कत्तलखाना उघडण्याचा प्रयत्न केला.
कत्तलखान्यात शिरण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाहून जमाव एकत्र झाला. त्यांनी महिला पत्रकाराला घेरले आणि तिच्यावर हल्ला केला. काहीजणांनी गैरवर्तन केल्याचा आरोपही महिला पत्रकाराने केला आहे. जमावाने आपल्याला मारहाण केली आणि येथून निघून जा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकाही जमावाने महिला पत्रकाराला दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.
महिला पत्रकार आणि पशुप्रेमींना काही जनावरांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, इतर जनावरे हसन बाबू आणि रहेमान यांनी लपविल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी हासन जिल्ह्यात काही पशुंचे मृतदेह कचऱ्यात फेकलेले आढळले होते. त्यानंतर आता अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांनी महिला पत्रकारावर हल्ला केला आहे. पोलिसांना याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.