नवी दिल्ली: एमडीएच (MDH) मसाल्यांच्या माध्यमातून घरोघरी आपले नाव पोहचविणारे महाशय धर्मपाल यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुलाटी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एमडीएचचे मालक धर्मपाल यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेला धर्मपाल यांनी आपल्या समर्पण व परिश्रमामुळे एक उद्योजक म्हणून नावं कमावलं होतं. तसंच त्यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणा स्त्रोत ठरले होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी धर्मपाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सिंह यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘भारतातील एक प्रतिष्ठित उद्योजकांपैकी एक महाशय धर्मपालजी यांच्या निधनामुळे मला दु: ख झाले आहे. छोट्या व्यवसायापासून सुरुवात करुनही त्यांनी आपली एक खास ओळख बनवली होती. ते सामाजिक कार्यात बरीच सक्रिय होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय राहिले. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो.’
दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘भारताचे प्रेरणादायक उद्योजक एमडीएचचे मालक धर्मपाल यांचे आज सकाळी निधन झाले. मी त्यांच्यासारख्या उत्साही व्यक्तीला कधीच भेटलो नाही. त्यांच्या आत्माला शांती लाभो.’
भारत के प्रतिष्ठित कारोबारियों में से एक महाशय धर्मपालजी के निधन से मुझे दुःख की अनुभूति हुई है।छोटे व्यवसाय से शुरू करने बावजूद उन्होंने अपनी एक पहचान बनाई। वे सामाजिक कार्यों में काफ़ी सक्रिय थे और अंतिम समय तक सक्रिय रहे। मैं उनके परिवार के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूँ।
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 3, 2020
धर्मपाल यांचे वडील चुन्नीलाल हे सियालकोट (जे आता पाकिस्तानात आहे) येथे मसाल्यांचे दुकान चालवित होते. ज्याचे नाव महाशियां दी हट्टी असे होते. त्यानंतर त्यांच्याच नावावरुन धर्मपाल यांनी आपल्या मसाल्यांना MDH असे नाव दिले होते. जो आज एक मोठा ब्रँड बनला आहे.
देशाची फाळणीनंतर धर्मपाल हे भारतात आले आणि १९५९ साली त्यांनी दिल्लीत आपला मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. असे म्हणतात की, सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्लीत टांगा देखील चालवला होता. पण आपल्या परिश्रम व मेहनतीच्या जोरावर ते देशातील बड्या उद्योगपतींमध्ये सामील झाले.