उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशात वाद झाल्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकांनांसंबंधी बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, भाजपा कार्यकर्ता धिरेंद्र सिंह याने जयप्रकाश यांची गोळ्या घालून हत्या केली. धिरेंद्र सिंह भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाच सेकंदाच्या या व्हिडीओत तीन वेळा गोळीबार झाल्यानंतर लोक घाबरुन पळताना दिसत आहेत.
रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. पण सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे. एका तंबूत सुरु असलेल्या या बैठकीसाठी प्रशासकीय तसंच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आमदार सुरेंद्र सिंह यांनी आरोपी भाजपा कार्यकर्ता असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं असून असे प्रकार कुठेही घडू शकतात असं म्हटलं आहे. “हे कुठेही होऊ शकतं. या घटनेत दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरु होती. कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल,” असं त्यांनी म्हटलं आहे.
पीडित व्यक्तीच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर १५ ते २० जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी उपविभागीय दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही इतरांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.
अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अशी माहिती गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी दिली आहे. दरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.