जळगाव – शहरातील शाहूनगर प्रिंपाळा रोड येथे असलेल्या एका कपाट दुकानातून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यचा पोलीस सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळामधील वाणी गल्लीत राहणारे विलास मुरलीधर नाईक ह्यांचे शाहूनगर मधील प्रिंपाळा रोडवर कपाट विक्रीचे दुकान आहे. 2 नोव्हेंबरला दुकाना एकटे असताना कपाट घेण्याचा बहाणा करीत एक जण आत आला. त्याला कपाट नसल्याचे सांगत असतानाच दुसऱ्याने त्याच्यापाठोपाठ दुकानात अनधिकृत प्रवेश केला आणि दुकानाचे शटर आतून लॉक केले.
दुकानमालक नाईक यांना चाकूचा धाक दाखवित त्यांच्या खिश्यातील एक हजार रूपये आणि टेबल्यावर ठेवलेला मोबाईल घेऊन तेथून पळ काढला याप्रकरणी शहर पोलीस स्थानकामध्ये अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जळगाव जिल्हयातील खून ,दरोडे, जबरीचोरी, घरफोडी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, सफौ. विजय पाटील, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, दिनेश बडगुजर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर यांना रवाना केले होते.
या पथकाला गोपनिय माहितीच्या आधारे धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा परिसरातील शेत शिवारात सदर जबरी चोरी करणारे संशईत इसमांचा वावर असल्याचे कळाले. त्या अनुषंगाने वरील पथकाने त्याठिकाणी सापळा लावून दिपक चैनराज ललवाणी (वय – ३२ रा.मुसळी फाटा, ता.धरणगाव), दिपक भिका चव्हाण (वय – ३२ रा.इंद्रनिल सोसायटी, जळगाव) यांना ताब्यात घेतले. दोघांना पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याजवळ जबरीने चोरी केलेला मोबाईल मिळुन आल्याने त्यांना गुन्हयांचे तपास कामी जळगाव शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.