जळगाव- शहरातून जाणाऱ्या नऊ किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून चौपदरीकरणाच्या अंतर्गत शिव कॉलनी, मिल्लत नगर व अग्रवाल चौक येथे नव्याने उड्डाणपूल करण्याचे १५ मार्च रोजी झालेल्या महामार्ग बैठकीत ठरले होते व तसे आदेश खासदार उन्मेष पाटील यांनी महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर सिन्हा यांना दिले होते.
सदर बैठकीत जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे ,महापौर भारतीताई सोनवणे ,विविध पक्षाचे नगरसेवक, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, मनपाचे अभियंता, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर सिन्हा व त्यांचे सहकारी व जळगावचे जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी उपस्थित होते.
खासदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामार्गाच्या सभेमध्ये ठरून तीन पासवे अर्थातच उड्डाणपूल ,प्रभात चौकातील दुरुस्ती तसेच मेजर व मायनर जंक्शन बाबत ठराव करून व सदर सुधारित ९ किलोमीटरचा डीपीआर तयार करून तो राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य कार्यालयास त्वरित सादर करावा असे ठरले होते. परंतु आज पूर्ण ८ महिने होत आले त्यात फक्त प्रभात चौकच्या डीजाईनमध्ये सुधार करण्यात आला. परंतु २ पास वे चे सुधारित प्रस्ताव अद्याप सादर केलेले नाही. मील्लत नगर व अग्रवाल चौक सुधारित डीपीआर का सादर करण्यात आला नाही याबाबत मेहरून वासीयांनी आज जळगावी दौऱ्यावर आलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले आहे.
मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी महामार्ग कृती समितीचे नगरसेवक रियाज बागवान यांच्याशी चर्चा केली. तसेच जळगाव येथे कार्यालयीन कामासाठी आलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची देखील शिष्ट मंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात फारुक शेख सह ॲडव्होकेट इमरान शेख, एडवोकेट आमीर शेख, दानिश सय्यद व अनिस शाह यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत देखील उपस्थित होते.
या तीन पानी निवेदनात नमूद केले आहे की, सात दिवसात मिल्लत नगर चा पास वे चा सुधारित प्रस्ताव न पाठवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच कायदेशीर लढा देण्यात येईल. सदर निवेदनाच्या प्रती खासदार उन्मेष पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक जळगाव व प्रोजेक्ट डायरेक्टर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.