जळगाव – जिल्ह्याला तब्बल १४८ वर्षांची थोर परंपरा लाभलेला रथोत्सव यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. रथाचे जागेवरच पूजन केल्यानंतर अवघे १० पाऊले रथ ओढला जाणार आहे.
जळगावच्या जुन्या गावातील रामपेठेतील प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हे ग्रामदैवत मानले जाते. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो.
सकाळी ११ वाजता संस्थानचे गादिपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन केले जाणार आहे. त्यानंतर सेवेकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रथ जागेवरच १० पाऊले ओढला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, सुमारे दीडशे वर्षांची परंपरा खंडित होऊ नये या अनुषंगाने रथोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन-भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो.
वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणिमात्रांचेही ऋण मानते. त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जातो. यात घोडा, हत्ती, सिंह, मोर, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती अशी १० दिवस वहने निघतात. कार्तिकी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाचा समारोप होतो. यामुळे जळगावनगरीत 15 दिवसांचा दीपोत्सव व आनंदोत्सव साजरा होत असतो.
आजतागायत १४८ वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा रथोत्सव अद्ययावतपणे सुरू आहे. कार्तिकी शुद्ध एकादशीला रथाची गाव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्री सवाद्य रथावरील देव उतरवून पुन:श्च मंदिरात नेले जातात. कार्तिकी शुद्ध द्वादशीला शेवटचे वहन म्हणून कृष्णाची रासक्रीडा असते.