मुक्ताईनगर- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने मागील आठ महिन्यांपासून मंदिरे बंद करण्यात आली होती, मात्र काही प्रमाणात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य शासनाने १६ नोव्हेंबर पासून काही अटींचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली केली आहेत. अनेक दिवसांपासून आईंच्या दर्शनाची आस लागल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनास येत आहेत.
मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे अनेक राज्यात दिसुन आले आहे. येत्या कार्तिक एकादशी वारीस हजारो भाविक संत मुक्ताबाई दर्शनाला आल्यास कोरोना संक्रमणाचा फैलाव अधिक वेगाने वाढण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून शासनास सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी म्हणून व मंदिरात एकाच दिवशी गर्दी होवू नये, याकरिता श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर विश्वस्त मंडळाने येत्या कार्तिक शुध्द एकादशी गुरुवार दि.२६ नोव्हेंबर रोजी संत मुक्ताबाई मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणून वारकरी भाविकांनी कार्तिक एकादशीला दर्शनास येवू नये, असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच इतर दिवशी मात्र मंदीर उघडे राहील व नियमाप्रमाणे सोशल डीस्टसींगचे पालन करित मास्क घालून भाविकांना मुक्ताबाई दर्शन घेता येईल. अशी देखील माहिती संस्थानने दिली आहे.