वरणगाव – येथील राजमल ज्वेलर्स हे दुकान फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहूर ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे. वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स हे ज्वेलरी शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडल्या प्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात गुरन १७९/२०१९ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यापासून आरोपींचा शोध सुरु होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भुसावळ शहरातील व पहुर पाळधी येथील काही तरुण जळगाव जिल्ह्यात घरफोडी, मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी सारखे विविध प्रकारचे गुन्हे करीत आहे. त्या अनुषंगाने श्री.बकाले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पोहेका. सुनील दामोदरे, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पंकज शिंदे, परेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील यांचे पथक स्थापन केले होते.
सदर पथकाने पहुर तालुका जामनेर येथून मोहित उर्फ आकाश नरेंद्र जाधव (वय-२२, रा. पहूर पाळधी, ता.जामनेर) याला ताब्यात घेतले. मोहितची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, सिद्धार्थ उर्फ सोनू अरुण मस्के (रा. रेल्वे कॉलनी, कंडारी) याच्या सांगण्यावरून दोघांनी मिळून वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स दुकानात चोरी केली होती.
तसेच एक मोटरसायकल देखील चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून सिद्धार्थ उर्फ सोनू याने आणखी काही मुलांना सोबत घेऊन चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यासोबतच्या इतर आरोपींचा शोध सुरु आहे.