जळगाव- शहराचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचे पुत्र राकेश यांच्या खुना प्रकरणी आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळधी येथून अटक केली आहे. सदर आरोपीचे नाव आकाश मुरलीधर सपकाळे (वय २३ रा. कांचन नगर) असे आहे.
शहरात ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास माजी महापौर अशोक सपकाळे यांचे पुत्र राकेश सपकाळे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. खून झाल्यापासून यातील संशयित आकाश सपकाळे हा आरोपी फरार होता. त्याच्या शोधार्थ विविध पथके स्थापन करण्यात आले होते.
पथकांनी यापूर्वी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडत नव्हता. परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आकाश शुक्रवारी रात्री पाळधी (ता.धरणगाव) येथे येणार आहे. त्यानुसार पोहेकॉ. विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, रतन गीते, आदींनी पाळधी गावात सापळा रचून आकाशला मध्यरात्री त्याला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


