जळगाव- जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनरुज्जीवन समिती सभा, आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.
या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.
याप्रसंगी निर्यात प्रचालन समितीची सभेच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सूचना दिली की, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास सर्व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे. तसेच जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यसाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. रोजगारासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग आले पाहिजे, जे उद्योग आहेत ते चांगल्या प्रकारे चालले पाहिजेत. व नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याकरीता त्यांना आवश्यक असलेल्या रस्ते, वीज व पाणी या मुलभूत, पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महानगरपालिका, विद्युत वितरण कंपनी यांनी तातडीने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. उद्योजकांच्या अडचणी सोडविताना त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्यात.
त्याचबरोबर उद्योजकांनीही आपल्या उद्योगात स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उद्योगमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
सदर बैठकीस दि. इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडिस्ट्रीज संघटना यांनी विद्युत वितरण कंपनी विद्युत भार कमी करणे, अतिरिक्त लावलेले मागणी शुल्क परत न देणे, वीज ग्राहकाची वर्गवारी बदलल्यानंतर फरकाची रक्कम परत न मिळणे, वीज जोडणी वेळेत न मिळणे, लघु उद्योग भारती संघटनेच्यावतीने औद्योगिक वसाहतीमधील बंद पथदिवे सुरु करणे, काशिनाथ हॉटेलकडून एम. सेक्टरकडे जाणेसाठी रस्ता बनविणे, औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटारी बांधणे, औरंगाबाद महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आदि विविध विषय बैठकीत उपस्थित केले.
बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दंडगव्हाळ यांनी केले. तसेच जिल्ह्यात विशाल व मोठे १८ उद्योग असून यामध्ये ८९९४ इतका रोजगार उपलब्ध असून त्यापैकी ८१६३ स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे. तर स्क्षुम, लघु व मध्यम ३७८३३ उद्योग असून यामध्ये १ लाख ४६ हजार ६३७ रोजगार असून त्यापैकी १ लाख ३१ हजार ९७३ स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आल्याची माहिती दिली.
या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वीज वितरण कंपनी, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग व महामंडळ, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.