पणजी: सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या पुनरागमनासह (आयएसएल) करोनाच्या जागतिक साथीमध्येही देशातील फुटबॉलचे पुनरागमन होत आहे. शुक्रवारी जीएमसी स्टेडियमवर केरला ब्लास्टर्स आणि एटीके मोहन बागान यांच्यात लढत होत आहे.
मार्च महिन्यात सहाव्या हिरो आयएसएलचा अंतिम सामना एटीके आणि चेन्नईयीन यांच्यात झाला तेव्हा संसर्ग भितीदायक पद्धतीने देशभर पसरत होता. अंतिम सामना प्रेक्षकांशिवाय पार पडला होता. सामान्य जीवन ठप्प होण्यापूर्वी झालेली ती एक अखेरची क्रीडा स्पर्धा ठरली होती.
आता आठ महिन्यांत देशात पुनरागमन करीत असलेली पहिली मोठी क्रीडा स्पर्धा आयएसएलच ठरली आहे. आता सुद्धा प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. जैव-सुरक्षित विभागात गोव्यात सर्व संघ खेळतील. यंदा हीच एक बाब वेगळी नाही. यंदा एका संघाची भर पडली असून ही आजवरची सर्वांत मोठी आयएसएल ठरेल. एससी ईस्ट बंगालच्या पदार्पणासह सहभागी संघांची संख्या एकने वाढून 11 झाली आहे, तर एकूण सामने 95 वरून 115 पर्यंत वाढले आहेत.
ईस्ट बंगालचे पदार्पण होईल, तर एटीके-मोहन बागान यांचे विलीनीकरण झाले आहे. त्याबरोबरच भारतीय फुटबॉलमधील सर्वाधिक ऐतिहासिक वारसा असलेले दोन संघ आयएसएलमध्ये प्रथमच आमनेसामने येतील. ही बहुचर्चित कोलकता डर्बी 27 नोव्हेंबर रोजी रंगेल. दोन्ही संघांमधील खेळाडू आणि चाहत्यांची उत्सुकता तेव्हा ताणलेली असेल.
ईस्ट बंगालने भरती केलेला नॉर्विच सिटीचा स्टार अँथनी पिल्कींग्टन याने सांगितले की, स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा डर्बी तसेच ही लढत किती प्रतिष्ठेची असते याबद्दल आम्हाला सांगण्यात आले. साहजिकच मोसमाचा प्रारंभ होण्यासाठी मी आतूर झालो आहे. ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरेल याची मला खात्री आहे.
फातोर्डा येथील जवालरलाल नेहरू स्टेडियम, वांबोळी येथील जीएमसी स्टेडियम आणि वास्को येथील टिळक मैदान येथे सामने होतील. चाहते स्पर्धेचा थरार घरी थांबून टीव्हीवर लुटणार असले तरी गोव्यातील तीन स्टेडियमवर त्यांची गैरहजेरी जाणवणार नाही. नावीन्यपूर्ण अशा फॅन वॉल संकल्पनेमुळे घरच्या मैदानावर गर्दी करणारे स्थानिक तसेच प्रतिस्पर्धी संघाचे समर्थक प्रोत्साहन देण्यास उपस्थित असतील. स्टेडियमवर दोन एलइडी स्क्रीन लावण्यात येतील. त्यामुळे दोन्ही संघांना प्रोत्साहन मिळेल.
अजून वाचा
कोरोनामुळे मोठा फटका, भारतात पुढच्या वर्षी होणारा वर्ल्ड कप रद्द