नवी दिल्ली : कोरानाच्या जीवघेण्या संसर्गामुळे फुटबॉलचे संचालन करणारी संस्था फिफा ने भारतातला ‘अंडर-17 महिला वर्ल्ड कप’ रद्द केला आहे. यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये नाराजी आहे. पुढच्या वर्षीऐवजी थेट 2022 मध्ये भारताला सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 2021 ला होणारा सामना पुढे ढकलण्यात आली आहे. फिफा समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे अंडर-17 महिला आणि अंडर-20 महिला वर्ल्ड कप असे दोन्ही सामने पुढच्या वर्षासाठी रद्द करण्यात आले असून 2022 मध्ये या सामन्यांचं आयोजन करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. फिफा-कॉन्फेडरेशन कोरोनाच्या धोक्यासंबंधी सर्व संस्थेशी चर्चा केली आणि त्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात यापूर्वी हा वर्ल्ड कप यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणार होता पण कोरोनाच्या धोक्यामुळे पुढच्या वर्षी (2021) फेब्रुवारी-मार्चमध्ये सामना ढकलण्यात आला. पण संसर्गाचा फैलाव पाहता आता तो थेट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे अनेक स्पर्धांवर मोठा परिणाम झाला आहे. कन्फेडरेशन्स ऑफ आफ्रिका, उत्तर आणि मध्य अमेरिका आणि कन्फेडरेशन्स ऑफ दक्षिण अमेरिकेनेही पात्रता (क्वालिफाइंग) फेरी घेतल्या नाहीत. तसेच युरोपनेही त्यांची पात्रता फेरी रद्द केली. यामध्ये स्पेन, इंग्लंड आणि जर्मनी यांचाही समावेश आहे.