जळगाव – तालुक्यातील वावडदा येथे घरघुती कार्यक्रमासाठी आजीसोबत असलेल्या नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील वावडदा येथील बिसमिल्ला सिरस तडवी यांना मुलगा झाल्याने घरात कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने यावल तालुक्यातील सावखेडा येथे राहणाऱ्या मोठ्या भावाचा मुलगा मयुर संजू तडवी (वय-९) हा आजीसोबत काल बुधवार १८ रोजी वावडदा येथे आला होता.
सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराच्या ओट्यावर काही मुलांसोबत मयूर खेळत असतांना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. दरम्यान मयत मयूरचे आईवडील कामानिमित्त नाशिक येथे गेले होत.
जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अतुल पाटील करीत आहे.