जळगाव- शहरातील शाहूनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या अंगणवाडीचे स्थलांतर झाल्यानंतर या चार खोल्यांमध्ये काही नागरिकांनी त्यांची सामाजिक संस्था सुरु करून लग्न समारंभासाठी ही जागा दिली जात आहे, हे थांबविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. गुप्ता यांनी मनपा आयुक्त यांना इमेल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अंगणवाडीत जळगाव शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीएल सार्वजनिक वाचनालय व बालवाडी, आयडीएल शिवण क्लासेस या नावाने संस्था चालू करण्यात आली.
थोड्या दिवसांनी या संस्थेचा बोर्ड काढून येथे लग्न समारंभ, साखर पुडा, समाजाच्या बैठकींसाठी वापर करणे, ही जागा भाडेतत्वार देवून मोठ्या प्रमाणात कमाई करून भ्रष्टाचार केला जात आहे. या जागेवर सार्वजनिक कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या उष्ट्या पत्रावळी, चहाचे प्लास्टिक कप, प्लास्टिक ग्लास अस्ताव्यस्त स्वरुपात फेकण्यात येत असतात, हे सर्व थांबविण्यात यावे अशी मागणी केली आहे.
या पत्रावर रवींद्र विसपुते यांची स्वाक्षरी आहे. या पात्रानुसार दीपककुमार गुप्ता यांनी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.