जळगाव – शहरातील एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरात बेकायदेशीर लोखंडी सुरा सोबत घेवून फिरणाऱ्या १९ वर्षीय तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरातील हॉटेल प्रिन्सजवळ एक तरूण बेकायदेशीर धारदारशस्त्र घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ जयंत चौधरी, पो.कॉ. परेश महाजन आणि पो.कॉ. पंकज शिंदे अशांना ट्रान्सपोर्ट नगरात रवाना केले.
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी लोकेश चंद्रकांत दंडगव्हाळ (वय-१९) रा. हॉटेल प्रिन्सजवळ, ट्रान्सपोर्ट नगर याला अटक केली. त्यांच्या ताब्यातील ८ इंचाचा धारदार सुरा हस्तगत करण्यात आला.
पो.कॉ पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी लोकेश दंडगव्हाळ याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.