जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील नियमित, अनुशेषित व रिपीटर्सच्या परीक्षेसाठी अर्ज सादर करूनही जे विद्यार्थी सदर परीक्षेपासून वंचित राहिले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आल्या. तथापि जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही काही अपरिहार्य कारणामुळे या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत, अशा सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर, २०२० या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार फक्त ऑनलाईन पध्दतीने सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळत परीक्षा घेण्यात येणार आहेत.
सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २० नोव्हेंबर, २०२० या कालावधीमध्ये आणि २४ ऑक्टोंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीतील वेळापत्रकातील सर्व विषयांसाठी परीक्षा २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाने लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील ऑनलाईन परीक्षा समन्वयकांशी संपर्क साधावा. या परीक्षेनंतर परीक्षांचे पुनश्च: आयोजन करण्यात येणार नाही.