जळगाव :- कापुस पिक माहे 15 डिसेंबर अखेर शेतातुन काडुन टाकावे व फरदड घेऊ नये तसेच गहु, हरभरा रब्बी ज्वारी या पिकांची पेरणी करावी, 15 डिसेंबर नंतर 5 ते 6 महीने कापुस विरहीत शेत ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते व त्यामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो, शेदरी बोंडअळीला डिसेंबर महिन्यानंतर खादय उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालु राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो.
हंगाम संपल्यावर शेतामध्ये शेळया, मेढया तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत, कपाशीच्या पऱ्हाटयांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करुन बांधावर ठेवु नये. पऱ्हाटयांपासून बि.डी. कंपोस्ट खत तयार करावे, पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.
पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील, जिनींग – प्रेसिंग मिल तसेच कापुस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे ( फेरोमन ट्रॅप्स) लावावेत, गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 20 % ईसी ( 250 मिली पँकींग साईज ) या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे.
सदरचे किटकनाशके महाराष्ट्र कृषि उदयोग विकास महामंडळ यांचे मार्फत त्यांचे अधिकृत डीलर मार्फत करण्यात येत आहे. सदरचे किटकनाशके पुरवठा 50 टक्के अनुदानावर करण्यात आले आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.