जळगाव – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे रेल्वेच्या मालधक्काचे प्रत्यक्ष कामाला पुढील आठवड्यात साधारण २५ नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात होणार आहे. याबाबत शासकीय मोजणी देखील पूर्ण झाली असून पुढील सहा महिन्यात काम पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
रेल्वेचा मालधक्का पाळधी किंवा शिरसोली येथे होणार असे बोलले जात होते. त्यात काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, उद्योजक सुनील झंवर यांनी नवी दिल्लीत प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन मालधक्क्याविषयी त्यांनी माहिती दिली होती.
याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील पाठपुरावा केला होता. विकासाच्या दृष्टीने आणि व्यापाराच्या दृष्टीने मालधक्का पाळधी येथे राहणे योग्य राहील असे काहीसे लक्षात आल्यानंतर आणि सरकारी परवानगी मिळाल्यानंतर आता पाळधी येथे मालधक्का करण्याचे निश्चित झाले आहे.
यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांनी पाळधी येथे मालधक्क्याच्या जागेची मोजमाप करून पाहणी केली. त्यानुसार आता पुढील आठवड्यात २५ तारखेपासून मालधक्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
पाळधी येथे सुप्रसिद्ध साई मंदिरच्या बाजूला आणि रेल्वे रुळाच्या जवळ हा मालधक्का होणार असून यामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती येईल असे बोलले जात आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येत असल्याने उत्तर भारतातील व्यापाराला देखील चालना येणार आहे. साधारण सहा महिन्यानंतर मालधक्का बनून पूर्ण होईल, असा देखील अंदाज आहे.