जळगाव – जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यासोबतच प्रमुख मार्गांवरील प्रकाशव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
दरम्यान, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळातही शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही आमदार भोळे यांनी स्पष्ट केले.
या निधी मंजुरीबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केले.
शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आपले ध्येय असल्याचे सांगत, जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.

