जळगाव – शेतीसमोरील आव्हाने, बदलते हवामान, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ-उतार शेतीसमोर या अनेक अडचणी आहेत. मात्र, या अडचणींना न घाबरता नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य नियोजन आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत पद्धतीने करता येते. मग एखाद्या उद्योग-नोकरीपेक्षाही शेती श्रेष्ठ ठरते, असे प्रगतशील शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली)च्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी ४ जून रोजी शेतकरी-विद्यार्थी यांच्यात संवाद झाला.
शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवकथनातून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील संधी, नवकल्पना आणि उद्योग याबाबत माहिती दिली. संध्याकाळी झालेल्या सत्रात प्रगतिशील शेतकऱ्यांच्या चर्चेत स्वप्नाताई राजू चौधरी, अभिजीत विकास शेळके, पद्माकर जगन्नाथ पाटील, यश चंद्रकांत चौधरी, राजू चौधरी हे शेतकरी सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांना फालीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून शेतीबद्दल अधिक माहिती घेतली.
शिरपूर येथील स्वप्नाताई चौधरी यांनी सांगितले की, नवतंत्रज्ञान आणि परिश्रम एकत्र आले तर शेती ही परवडणारी ठरते. नोकरी करणाऱ्या पतीपेक्षा मी शेतकरी पतीच निवडला. जामनेर तालुक्यातील भागदरा येथील युवा शेतकरी अभिजीत विकास शेळके यांनी नोकरीपेक्षा परिवारात राहून शेती करणे यास अधिक प्राधान्य दिले. यासंदर्भामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला. तरडी येथील प्रयोगशील शेतकरी पद्माकर जगन्नाथ पाटील यांनी आपल्या शेतात पपई, केळी आणि अन्य फलोत्पादनाचे प्रयोग यशस्वी केल्याचे सांगितले. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील यश चंद्रकांत चौधरी यांनी कृषी पदवी शिक्षणानंतर शेतीच करण्याचे ठरवले. आधुनिक पद्धतीने जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाचा अवलंबन करून डाळिंबामध्ये भरघोस उत्पादन घेतल्याचे त्यांनी सांगितले. डाळिंबासमवेतच जैनची टिश्यू कल्चर केळी, सोयाबीन यांची देखील लागवड त्यांनी आपल्या शेतामध्ये केली आहे. यावेळी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील विद्यार्थ्यांची सुसंवाद साधत आपल्या ज्ञान आणि अनुभवाचे दालन खुले केले.
तत्पूर्वी सकाळ सत्रात विद्यार्थी व अॅग्री कल्चर एज्युकेटर यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यात परिश्रम हॉल, जैन हिल्स कृषी संशोधन केंद्र, ठिबक सिंचन डेमो, अल्ट्रा हाय डेंसिटी प्लांटेशन, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू व टिश्यू कल्चर प्रकल्प पाहिले. हायटेक प्लॉट फॅक्टरीत टिश्यू कल्चर रोपांची निर्मिती प्रक्रिया पाहून विद्यार्थी थक्क झाले. या उपक्रमाला जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, यूपीएल, आयटीसी, स्टारअॅग्री, प्रॉम्प्ट डेअरीटेक, एसबीआय फाउंडेशन आदी अग्रगण्य कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे.

