जळगाव, दि. 29 एप्रिल – नीट (यूजी) परीक्षा दिनांक ३ मे २०२६ रोजी होणार असून परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात नीट (यूजी) परीक्षेसाठी एकूण ११ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा काळात केंद्रांवर गैरप्रकार तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, ३ मे रोजी परीक्षा सुरू झाल्यापासून ते परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानेही वरील कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी जारी करण्यात आला असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


