जळगाव – जळगाव क्रिकेट लिग 2026 मध्ये जळगाव कोगटा किंग संघाने आपली दमदार कामगिरी कायम ठेवत अमळनेर सुहांस जायंट्सवर 31 धावांनी विजय मिळवला. या विजयासह कोगटा किंग संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर या सामन्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
नाणेफेक जिंकून अमळनेर संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, जळगाव कोगटा किंगच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांनी पहिल्या चार षटकांत 44 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ओम भोसलेने तुफानी खेळी करत अवघ्या 65 चेंडूत 130 धावा ठोकत सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. अक्षय मेघानीने 33 धावांची उपयुक्त साथ दिल्याने कोगटा किंगने 20 षटकांत 220 धावांचा डोंगर उभारला.
उत्तरादाखल अमळनेर सुहांस जायंट्सची सुरुवात डळमळीत झाली. कर्णधार शुभम शर्मा याने 68 धावांची झुंजार खेळी केली, तर मानव टिभीरीवाला (34) आणि रणजीत निकम (25) यांनीही चांगला प्रयत्न केला. मात्र, निर्धारित षटकांत त्यांना 189 धावांपर्यंतच मजल मारता आली.
कोगटा किंगकडून मनिष चौहानने 3 बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयामुळे संघाने सलग दुसरा विजय नोंदवत 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. सामनावीर पुरस्कार ओम भोसले याला देण्यात आला. जळगाव क्रिकेट लिगमधील रोमांचक सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची वाढती गर्दी लक्ष वेधून घेत आहे.

