जळगाव – इकरा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथे योग व त्याचे शारीरिक तसेच मानसिक लाभ याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १० दिवसीय योग कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत योग प्रशिक्षिका सौ. निगार शहा (शिफा फिटनेस) यांनी मार्गदर्शन करत सहभागी विद्यार्थिनींना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. योग्य पद्धतीने योगाभ्यास केल्यास ताणतणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि आरोग्य सुधारते, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेचे उद्घाटन दि. २८ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वकार शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र क़ुरआनच्या तिलावतीने करण्यात आली. यावेळी डॉ. आयशा एफ. बासित यांनी योग प्रशिक्षिका निगार शहा यांचा परिचय करून दिला, तर डॉ. अंजली कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास डॉ. कहकशां अंजुम तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ही कार्यशाळा सलग १० दिवस चालली व दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी तिची सांगता झाली. कार्यशाळेदरम्यान डॉ. आयशा बासित, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. कहकशां अंजुम तसेच प्रा. डॉ. शबाना खाटिक यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सहभागी विद्यार्थिनींनी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगत भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.


