जळगाव – जळगाव तालुक्यातील कुसुंबे ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट मीटर बसविण्यास जाहीर विरोध करत आज ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असल्याने हा ठराव पारित करून तो महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
गावात वारंवार होणारा विजेचा लपंडाव, अवाजवी वाढीव व चुकीची वीजबिले ही स्मार्ट मीटरविरोधातील मुख्य कारणे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच संबंधित ठेकेदारांचे कर्मचारी ग्राहकांच्या मीटरमध्ये छेडछाड असल्याची भीती दाखवून पैसे उकळत असल्याचे प्रकार समोर आल्याचेही निदर्शनास आले आहे.
यामुळे महावितरणने प्रथम गावातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, नवीन वीजखांब व केबलचे काम पूर्ण करावे आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
या वेळी सरपंच अशोक पाटील, उपसरपंच चंद्रकांत पाटील, रामदास कोळी, भूषण पाटील, विशाल राणे, प्रमोद घुगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

