जळगाव – सध्या जळगाव शहर पूर्णतः खड्डेमय झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील शासकीय आयटीआय समोर महामार्गावर असलेल्या खड्डयामुळे एका दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी खड्डयात आदळल्यामुळे महिला खाली पडली व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
संगीता सुनील पाटील (४५, रा. चंदूअण्णानगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. संगीता पाटील या कुटूंबियांसोबत चंदूअण्णा नगरात राहतात़. गुरूवारी सायंकाळी त्या दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी मुलगा भरत याच्यासोबत दुचाकीने शहरातील बाजारात आल्या होत्या.
खरेदी झाल्यानंतर दोघेही घरी परतण्यासाठी दुचाकीने निघाले. रात्री ८ वाजेच्या सुमारास शासकीय आयटीआयसमोरून जात असताना अचानक खड्डयात दुचाकी आदळली गेली़, त्यामुळे दुचाकीवर बसलेल्या संगीता पाटील या रस्त्याच्या मधोधम पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
मुलगा भरत हा किरकोळ जखमी झाला़. तसेच मागून येणारी वाहने सावकाश असल्यामुळे सुदैवाने मोठी घटना घडली नाही. मात्र, शहरातील खड्डयांमुळे अपघात होऊन जखमी होण्याच्या घटनांची श्रृखंला सुरुच आहे, त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
पत्नी देखील थोडक्यात वाचल्यामुळे पती सुनील पाटील यांनी शहरातील खड्डयांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच महामार्गावरील खड्डयांची दुरूस्ती करण्याची मागणी त्यांनी केली.