जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात होऊ घातल्या आहेत. आज मुंबईत नगरपरिषदांच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यात भुसावळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसुचित जाती प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव झाले आहे. विशेष म्हणजे भुसावळ विधानसभा मतदारसंघ देखील सन २००९ पासून अनुसुचित जाती साठी राखीव आहे. तिथून विद्यमान आमदार आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे सातत्याने निवडून येत आहेत.
आता नगराध्यक्षपदही एससी महिला वर्गाकडे जाणार असल्याने विद्यमान मंत्री महोदयांच्या सौभाग्यवती सौ. रजनीताई सावकारे यांना भारतीय जनता पार्टी संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहूना त्यांच्याइतका प्रबळ उमेदवार पक्षाकडे नाही. तेव्हा आमदारकी, मंत्रीपद आणि आता भुसावळसारख्या मोठ्या नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही सावकारे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
लक्षात घ्या की, नाशिक विभागात भुसावळ ही एकमेव ‘अ’ वर्गाची नगरपालिका असून सर्वात मोठी पालिका आहे. जिल्ह्यातील ती सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हटली जाते.


