जळगाव – जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. कबड्डी, खो-खो, भालाफेक, गोळाफेक, हॉकी, फुटबॉलसह विविध सांघिक आणि वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक व कवी पोलीस विनोद अहिरे यांनी ओजस्वी आणि तडफदार शैलीत केले. त्यांच्या प्रभावी संवादासोबतच स्वलिखित कविता व शायरीने संपूर्ण कार्यक्रमाला वेगळेच रंगतदार स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित मान्यवरांसह श्रोत्यांनी त्यांच्या सादरीकरणाची दाद देत कौतुक केले.
या यशस्वी सूत्रसंचालनाबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत शुगरवार यांनी विनोद अहिरे यांचे अभिनंदन केले.


