जळगाव (नाजनीन शेख ) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षीय पातळीवरील जिल्ह्यातील दोन नियुक्त्या नुकत्याच केल्या. बंडखोर कुलभूषण पाटील यांना जिल्हाप्रमुखाचा सन्मान दिला. तर जिल्हा प्रमुख पद नको म्हणणाऱ्या करण पवारांना संघटकपदी नियुक्त केले. पक्षात वास्तविक गजानन मालपूरे यांचेसारखे निष्ठावान शिवसैनिक असतांना देखील या नियुक्त्यांमुळे ठाकरे गटाने जिल्ह्यातील इतिहासाची पुनरावृत्ती केली. कारण यापुर्वी देखील बंडखोराची नेमणूक जिल्हाप्रमुखपदी झाली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून तेव्हा चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी बंडखोरी करुन राज्यातील महायुतीविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती व ते निवडून देखील आले होते. अपक्ष आमदाराला कोणत्याही पक्षात जाता येत नाही हा लोकप्रतिनिधी कायदा सांगतो तरीही आ. चंद्रकांत पाटील यांची नेमणूक त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी केली गेली होती. तेव्हा जर कोणी हरकत घेतली असती, किंवा न्यायालयात गेले असते तर कदाचित चंद्रकांत पाटील हे सहज अपात्र होऊ शकले असते, व पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी आली असती. कारण पक्षाने त्यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली होती. याचाच अर्थ त्यांनी अपक्ष आमदार असतांनाही एखाद्या पक्षात प्रवेश केलेला होता. परंतु कोणीही हरकत घेतली नाही व पाटलांची आमदारकी शाबूत राहीली हा भाग वेगळा.
तर मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे बंडखोरांना पदे देण्याचा. कुलभूषण पाटील यांची ७ नोव्हेंबर २०२४ रोजी पक्षातून हकालपट्टी केली होती. आज हकालपट्टी झालेल्या कार्यकर्त्याचीच पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. याचाच अर्थ पक्षाविरोधात भुमिका घ्या आणि खुशाल जिल्हाप्रमुख पद मिळवा असा अलिखीत नियमच शिवसेना ठाकरे गटात आहे की काय? असा प्रश्न पडू लागला आहे.
वास्तविक शिवसेनेत वरीष्ठ जो आदेश देतील तो मानण्याची परंपरा आहे. पक्षाने व वरीष्ठांनी म्हणजेच उद्धवसाहेब ठाकरे यांनी सौ. जयश्री महाजन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय कुलभूषण पाटील यांनी स्विकारणे हेच पक्षशिस्तीत अपेक्षीत होते. मात्र त्यांनी तसे न करता, बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केला. वास्तविक पाहता कुलभूषण पाटील यांना त्याचा पिंप्राळा परिसर सोडला तर शहरात कुठेही पाया नव्हता. केवळ पलिकेच्या एक दोन टर्म मध्येच प्रतिनिधीत्व केल्यावर त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली होती. मात्र ते इतके सोपे नव्हते. स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल अवास्तव गैरसमज करुन घेतल्यामुळे त्यांना वाटत होते की, मतविभागणीत आपली नौका किनाऱ्याला लागेल. तसे झाले नाही. त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले, इतकी कमी मते त्यांना मिळालीत. इतकेच काय? मनपा निवडणूकीत त्यांना त्यांच्या प्रभाग १० ड मध्ये मिळालेल्या ४३१० मतांपेक्षाही कमी, म्हणजेच केवळ ३०३५ मते त्यांना मिळाली. हे त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण होते. वास्तविक पक्षाने त्यांना उपमहापौरपदाची संधी दिली होती. तेव्हा शहरात आपल्या नेतृत्वाचा पाया विस्तारीत करण्याची त्यांचेकडे संधी होती. परंतु ते केवळ आपल्याच विभागात अडकून राहील्याने किंवा त्यांची राजकीय क्षमता नसल्याने शहराचे नेतृत्व म्हणून कुलभूषण पाटील पुढे येऊ शकले नाहीत. नाही म्हणायला पिंप्राळा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे उभारलेले भव्य दिव्य स्मारक हेच केवळ त्यांच्या कर्तृत्वाचे ठळक उदाहरण होते. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी तेव्हढे पुरेसे नव्हते हे ते विसरले.
कुलभूषण पाटील यांच्या बंडखोरीने शिवसेना ठाकरे पक्षच अधिकृत उमेदवार आणि बंडखोर उमेदवार अशा दोन भागात विभागला गेला. या भांडणामुळे शहरातील पक्षाच्या अनेक ज्येष्ठ माजी नगरसेवकांनीसुद्धा निवडणुकीपासून स्वत:ला अलीप्त करुन घेतले. शिवसेना ठाकरे पक्षाचा पराभव तिथेच निश्चित झाला होता. कार्यकर्ते विभागलेले, वरीष्ठ नगरसेवक प्रचारापासून अलीप्त अशा स्थितीत पक्षाला विजय मिळू शकत नाही हे त्यावेळी तत्कालिन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना सांगाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एकतर त्याकडे दुर्लक्ष केले गेले वा त्यांची खाजगीत टिंगल केली गेली. यामुळे पक्षासाठी प्रमाणीकपणे धडपडणारे विष्णू भंगाळे एकाकी पडले. याचाच फायदा शिंदे गटाने घेतला व ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी पक्षाचे जिल्हाप्रमुख असलेल्या विष्णू भंगाळे यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. हा शिवसेनेला मोठा झटका होता. बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवार सौ. जयश्री महाजन यांनाही फटका बसला. कारण दुभंगलेली पक्ष संघटना जर एकसंध राहीली असती, तर विजय मिळविणे फार काही अवघड नव्हते.
अगोदर लोकसभेत दारुण पराभव, त्यानंतर विधानसभेत जिल्ह्यात मिळालेले सपशेल अपयश यामुळे शिवसेना ठाकरे गट हाताश झालेला दिसत आहे, त्यामुळेच पक्षाचे जिल्हाप्रमुख पद स्विकारण्यास करण पवार यांनी देखील असमर्थता व्यक्त केली. आणि मग बंडखोर कुलभूषण पाटील यांना ते पद दिले गेले. वास्तविक पक्षात गजानन मालपूरे यांचेसारखे कट्टर व निष्ठावान शिवसैनिक असतांना त्यांचा विचार देखील केला गेला नाही. कारण त्यांची नेमणूक होणे पक्षाच्या भविष्याच्याही दृष्टीने सर्वार्थाने योग्य ठरले असते. केवळ आर्थिक सक्षमता हाच निकष लावून झालेली ही निवड आहे हेच म्हणावे लागेल. शहरातील ४ लाख ३४ हजार मतदारातून केवळ ३ हजार (०.६९%) मते मिळविणारे नेतृत्व पक्षाला कितपत पुढे नेऊ शकेल हा संशोधनाचाच विषय आहे.


